Pune Crime : पुण्यात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. रात्री १० च्या सुमारास एका इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, एकाने पोलिसांच्या व अटक होण्याच्या भीतीने थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून गॅलरीतून खाली उडी मारली. यात हा व्यक्ति गंभीर जखमी झाल्याने दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.
ब्रायन रूडॉल्फ गियर (वय ५२, रा. बाणेर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पेठेतील लाजवंती लॉजमध्ये जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी दरवाजा वाजवला असता एकाने दरवाजा उघडला. समोर पोलिस दिसताच त्याने पुन्हा दरवाजा बंद केला व आत असलेल्यांना पोलिस आल्याची माहिती दिली.
दरम्यान, या वेळी ब्रायन याने पोलिसांच्या व अटक होण्याच्या भीतीने थेट दुसऱ्या मजल्यावरून गॅलरीतून खाली उडी मारली. यात त्याचा पाय मोडला. पोलिसांना ही बातमी समजल्यावर त्यांनी ब्रायन याला ताब्यात घेत रुबि हॉल दवाखान्यात भरती केले. दरम्यान, उपचार सुरू असताना ब्रायनचा रात्री १ च्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
लाजवंती कॉम्प्लेक्सयेथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट १ च्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यांनी दरवाजा उघडला असता झडती घेतली. मात्र, घरात कोठेही त्यांना जुगाराचे साहित्य मिळाले नाही.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गणेशोत्सवादरम्यान तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोघांनी एकाचा गळा चिरून खून केला. तर एकाने एका मॉलवर गोळीबार गेला. पुण्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना पुढे येत असल्याने आरोपींना पोलिसांचा धाक उरला नसल्याची बाब पुढे आली आहे.