Saamana Editorial on Republic Day : भारताच्या प्रजासत्ताक दिनी आजही नेहमीप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडले जातील. देश कसा लोकशाही आणि संविधानानुसार चालत आहे याचे दाखले दिले जातील. मात्र, परिस्थिती तशी आहे का? देशाचं संविधान, प्रजेचे घटनात्मक हक्क, अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. प्रजासत्ताक आहे कुठं?, असा भयंकर प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ देशातील जनतेवर आली आहे, अशी बोचरी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'त संविधानच खतऱ्यात या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या अग्रलेखातून मोदींच्या राजवटीवर जोरदार तोफा डागण्यात आल्या आहेत.
> प्रजासत्ताक दिनी दरवर्षी होणारे सोपस्कार आजही पार पाडले जातील. भारत आजही कसं ‘लोकशाही राष्ट्र’ आहे, स्वतंत्र भारताला प्रजासत्ताक बनविणाऱ्या राज्यघटनेचा कसा आदर केला जात आहे, सध्याचे राज्यकर्तेच फक्त लोकशाही आणि संविधानानुसार कसे राजशकट हाकत आहेत, याचे दाखले दिले जातील. संविधानाचे आणि लोकशाही शासन व्यवस्थेचे ‘अमृत’ देशातील प्रजेला २०१४ पासून सत्तेत आलेल्या मोदी राजवटीतच कसे मिळत आहे, त्यापूर्वी जनतेला कसे ‘हलाहल’च पचवावे लागले, अशा पिपाण्याही वाजविल्या जातील. मात्र खरंच अशी स्थिती आहे का?
> सत्ताधाऱ्यांचे दावे काहीही असले तरी वस्तुस्थिती तशी नाही हेच सत्य आहे. मोदी राजवटीत देशाची लोकशाही आणि संविधान सर्वात असुरक्षित झालंय. घटनात्मक संस्था आणि घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींना स्वातंत्र्य उरलेलं नाही.
> लोकशाहीचे चारही स्तंभ मोडकळीस आणण्याचे प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून सुरू आहेत. देशाला हुकूमशाहीच्या मार्गावर नेलं जात आहे. संविधानानं ग्वाही दिलेली सामाजिक समता आणि अखंडता कसोशीनं जपण्याची जबाबदारी आणि कर्तव्य राज्यकर्त्यांचं असतं. मात्र आजच्या राज्यकर्त्यांना याचं भान नाही. ते बेभान झालेत. दुहीची बीजं पेरून समाजघटकांनाही बेभान करण्याचा कुटील डाव खेळत आहेत.
> संविधानाला अपेक्षित सामाजिक एकोप्याला चूड लावली जात आहे आणि अराजक निर्माण करून देशाला हुकूमशाहीच्या खाईत लोटण्याचे प्रयत्न होत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधक आणि टीकाकारांची होणारी मुस्कटदाबी याच षडयंत्राचा भाग आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक उन्मादाला प्रोत्साहन दिलं जात आहे.
'मागच्या ७४ वर्षांच्या वाटचालीत कधीतरी, काहीतरी इकडे-तिकडे घडलंही असेल, परंतु संविधानच ‘खतऱ्या’त अशी स्थिती कधीच आली नव्हती. मागच्या नऊ वर्षांच्या एककल्ली राजवटीनं ही स्थिती निर्माण झाली केली आहे. आजचा आपला अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि धडाक्यात साजरा व्हायलाच हवा, परंतु ‘प्रजासत्ताक’ राष्ट्र या संकल्पनेलाच चूड लावणाऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांचा कावा आणि कांगावा जनतेनं आता ओळखायलाच हवा. शेवटी प्रश्न लोकशाही आणि संविधान वाचविण्याचा आहे, असं आवाहन अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या