राज्यभरातील अंगणवाडी सेविका गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या या प्रश्नांबाबत वास्तविक सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पुर्णपणे पाठिंबा दर्शवत मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, लसीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये या अंगणवाडी सेविकांचं योगदान खूप मोलाचं आहे. या अंगणवाडी सेविका वेतनवाढीच्या आणि निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी ४ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून तोडगा काढावा. तसंच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे रोखून ठेवलेले पगारही त्यांना तातडीने द्यावेत, अशी मागणी पत्राद्वारे प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी, या प्रमुख मागण्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांचे पगारही शासनाने अडवून ठेवले आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने त्वरित योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अशीही मागणी पत्राद्वारे गायकवाड यांनी केली.
संबंधित बातम्या