मतदानाची प्रक्रिया एकदा पार पडल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात त्याची. एक्झिट पोलसाठी विविध मिडिया कंपन्या आपआपले प्रतिनिधी काही ठराविक, निवडक मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून लोकांचा कौल जाणून घेत असतात. मतदान करून आलेल्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले जातात. त्या व्यक्तीने कुणाला मतदान केले याचा अंदाज बांधला जातो. हा सँपल सर्वे असतो.
मे २०२४ मध्ये पार पडलेली लोकसभा आणि ऑक्टोबर २०२४मध्ये झालेली हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले होते. त्यामुळे काल महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या विविध एक्झिट पोल्समध्ये संमिश्र अंदाज वर्तवण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि मविआमध्ये फार अंतर नसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नुकत्यात पार पडलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा अंदाज साफ चुकल्याचे आढळून येते. हरयाणात सत्ताबदल होऊन कॉंग्रेस पक्ष सत्तेत येईल असा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला होता. प्रत्यक्षात भाजपने हरयाणाची सत्ता कायम राखली होती.
लोकसभा निवडणुकीत बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपचे ३००-३५० खासदार निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात भाजपला २४० जागा मिळाल्या होत्या.
२०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभराच्या आत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. दिल्ली विधानसभेत ‘आप’ आणि भाजपदरम्यान अटीतटीची लढत झाली होती. या निवडणुकीत दिल्ली विधानसभेत आप पक्षाला ४० जागा मिळतील व काठावर बहुमत मिळवून आप दिल्लीत सत्तेवर येईल असा अंदाज बहुतेक एक्झिट पोलने वर्तवला होता. प्रत्यक्षात आप पक्षाने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला होता.
बिहारमध्ये २०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीदरम्यान निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रचारादरम्यान जेडीयू आणि आरजेडी ‘महागठबंधन’ने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले होते. परंतु एनडीएकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. या निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांच्या आधारे घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला एकूण २४३ जागांपैकी १००-१२७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात एनडीएला ५५ जागा मिळाल्या होत्या.
२००४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेवर असलेले तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने प्रचारादरम्यान ‘इंडिया शायनिंग’चा नारा दिला होता. या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये अटलबिहारी वायपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार २३०-२७५ जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येण्याचे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात एनडीएचे १८५ खासदार निवडून आले होते. तर कॉंग्रेस प्रणित यूपीएचे २१८ खासदार निवडून आले होते. २००४ साली कॉंग्रेसने डावे पक्ष (५९ खासदार), सपा (३९ खासदार) आणि बहुजन समाज पार्टी (१९ खासदार) यांच्या पाठिंब्यावर केंद्रात यूपीए आघाडीचे सरकार स्थापन केले होते.
२००७ साली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल घेण्यात आले होते. या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज दर्शवण्यात आला होता. ४०३ आमदार संख्या असलेल्या यूपी विधानसभेत सत्ताधारी समाजवादी पक्षाला ११०-११५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर बसपाला १००-१३० आणि भाजप ११०-१२० जागा मिळतील असे भाकित एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात निकालात मात्र बसपाला २०६ जागा मिळून मायावती या मुख्यमंत्री झाल्या होत्या.