prakash ambedkar attacks congress : लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीत सहभागाची चर्चा, नंतर घेतलेली फारकत आणि निवडणुकीत पदरी पडलेलं दारुण अपयश… या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ‘वंचित’ला भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी आसूड ओढले आहेत. मी लढत राहीन आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा नव्या जोमानं परत येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षावर भाजपची 'बी टीम' असा आरोप केला जातो. यावेळी मविआसोबत न गेल्यानं पुन्हा तो आरोप झाला. त्यावर आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. 'सोशल मीडियावर दररोज काँग्रेस समर्थक माझ्यावर आणि व्हीबीएवर भाजपची बी-टीम असल्याचा आरोप करतात. मी भाजपची बी-टीम आहे का? मी त्याच त्याच प्रश्नांची वारंवार उत्तरं देऊन थकलो आहे, असा त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे.
तुम्ही दहशतवादाच्या विरोधात आहात का? भारत किंवा पाकिस्तान क्रिकेट सामन्यात तुम्ही कोणाला सपोर्ट करता? असे प्रश्न देशातील प्रत्येक भारतीय मुस्लिमाला विचारले जातात. आमच्या पक्षावर होणारा आरोप हा त्याच प्रश्नांसारखा आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वंचितवर बी-टीमचा आरोप करताना केल्या जाणाऱ्या युक्तिवादाची उत्तरंही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहेत. मी निवडणूक लढवतो म्हणून मला भाजपची बी-टीम म्हटलं जातं. पण, मी निवडणूक का लढू नये? भारतात द्विपक्षीय व्यवस्था आहे का? तसं असेल तर काँग्रेसच्या समर्थकांनी त्यांच्या जातीयवादी आणि हुकूमशाही धन्यांना १९५० चा लोकप्रतिनिधी कायदा बदलायला सांगावा, असं आंबेडकर यांनी सुनावलं आहे. मी काँग्रेसवर टीका करतो असाही माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा युक्तिवाद असतो, पण मी भाजपवर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही, असं आंबेडकर म्हणतात.
'भाजपची बी-टीम असेन तर माझ्याकडं पैसा कुठे आहे? मी पुण्यात एका छोट्याशा २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये आहे आणि ती कोणीही मिळवू शकते. भाजपच्या ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्या आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आमच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात यावं. आमचं पार्टी ऑफिस तुमच्या भव्य, आधुनिक बाथरूमपेक्षा लहान आहे. आमचा पक्ष सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. फुले-शाहू-आंबेडकर आपल्या हृदयात आणि मनात आहेत. कशाच्या आधारे तुम्ही हे आरोप करता? मी विजयी व्हावं, असं काँग्रेसला वाटत नाही. मी कधीही भाजपसोबत जाणार नाही. पण मला एकटं लढण्यासाठी भाग पाडलं जातं. कोणत्याही स्वतंत्र आंबेडकरी नेतृत्वानं पुढं जावं, विस्तारावं असं काँग्रेसला कधीच वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
१९५२ च्या संसदीय निवडणुकीत बॉम्बे (उत्तर) आणि १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारा इथून काँग्रेसनं बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांच्या विरोधात इतकी विषारी आणि द्वेषपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली की त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि दोन वर्षांनी १९५६ मध्ये त्यांचं निधन झालं. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. भाजप आपला अजेंडा लपवत नाही. उघडपणे फुटीरतावादाचा प्रचार करतो. काँग्रेस आपला खरा अजेंडा लपवते. ते हसत-हसत बहुजनांना अडकवून त्यांचा गैरफायदा घेतात. बहुजन फसले की काँग्रेस आपले विषारी दात दाखवते. भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ आहेत, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये आंबेडकर पुढं म्हणतात, 'लोकांनी आम्हाला मतदान केलं असतं तर आम्ही संविधान वाचवण्यासाठी उभे राहिलो नसतो का? विचार करा! संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढा सुरू केला. त्यांना राज्यघटना वाचवायची असती तर त्यांनी आधी ती नष्ट केली नसती. संविधान वाचवण्याचं आणि दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं काम महाराष्ट्रात आमच्यापेक्षा चांगलं कोणी करू शकत नाही. आम्ही कोणत्याही बॉसला उत्तरदायी नाही. आम्ही फक्त आमच्या लोकांना जबाबदार आहोत. आम्ही कोणत्याही बाहुल्याच्या तालावर नाचत नाही. आम्ही कोणाचे चमचे नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमच्याकडं स्वतंत्र नेतृत्व आहे.
'माझं नाव प्रकाश आंबेडकर आहे. माझे आजोबा आपल्या देशाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे लोकशाहीची मूलभूत तत्त्वं म्हणून स्थापित केली. मी आंबेडकरवादी आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य वर्णद्वेष, भेदभाव आणि दडपशाहीनं पीडित लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केलं आहे आणि निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता मी लढत राहीन. मी वचन देतो की मी परत येईन. VBA परत येईल,' असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या