मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'झाडी, डोंगार…'फेम बंडखोर आमदार शहाजी पाटील याआधी काय म्हणाले होते? पाहाच!

'झाडी, डोंगार…'फेम बंडखोर आमदार शहाजी पाटील याआधी काय म्हणाले होते? पाहाच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 27, 2022 10:39 AM IST

Shahaji Bapu Patil on Shiv Sena: निधी मिळत नसल्याची तक्रार करत बंड करणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच नेमकं उलट वक्तव्य केलं होतं.

Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patil

Shahaji Bapu Patil on Shiv Sena: शिवसेनेत बंडाळी करून गुवाहाटीत मुक्कामी असलेले बंडखोर आमदारांचे वेगवेगळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा असाच एक व्हिडिओ बंडाळीनंतर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी आपली कामं होत नसल्याची तक्रार केली होती. मात्र, यानंतर शहाजी बापू पाटील यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी नेमकं उलट मत मांडल्याचं दिसत आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यातला हा व्हिडिओ आहे. माझ्यावर कुठलाही अन्याय झाला नाही, असं त्यांनी यात म्हटलं आहे. ‘गेल्या दोन वर्षात माझ्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी २४० कोटी रुपयांचा विकासनिधी दिला. त्याची यादी मी आपल्यासमोर ठेवतोय. कुणीही ही यादी वाचावी. आता मी १०४७ कोटींचा निधी मी वेगवेगळ्या खात्यांकडं मागितला आहे. मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आर्थिक वर्ष संपताना या तालुक्यातील विकासनिधीचा आकडा दीड हजार कोटींच्या पुढं जाईल, असं शहाजी पाटील म्हणताना दिसत आहेत. 'शिवसेना हा पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत मी कडवा आहे आणि कडवाच राहणार आहे. शिवाय मी जिवंत असेपर्यंत माझे नेते उद्धव ठाकरे हेच राहतील. हा पक्ष मी राजकीय गणितानं स्वीकारलेला नसून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्वाकडं पाहून स्वीकारला आहे. माझ्या मृत्यूपर्यंत हीच भावना राहणार आहे. माझे नेते उद्धवजी ठाकरेच आहेत आणि मी जिवंत असेपर्यंत तेच माझे नेते राहतील, असं शहाजी पाटील यांनी म्हटलं होतं.

‘स्वाभिमान आणि धाडसी राजकारण शिकावं तर बाळासाहेबांकडून आणि महाराष्ट्राबद्दलचा अभिमान शिकावा तर बाळासाहेबांकडून असं मी काँग्रेसमध्ये काम करतानाही काँग्रेसच्या व्यासपीठावरूनही जाहीरपणे सांगत होतो’, असंही शहाजी बापू यांनी म्हटलं होतं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या