मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : प्रभू राम मांसाहारी होते?; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा!

Sharad Pawar : प्रभू राम मांसाहारी होते?; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 09, 2024 02:36 PM IST

Sharad Pawar on Lord Ram Non Vegetarian Remark : जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar on Lord Ram Non Vegetarian Remark : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या आहाराबद्दल केलेल्या वक्तव्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. ‘आव्हाड यांनी हे वक्तव्य करण्याची गरज नव्हती,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक मान्यवरांना आमंत्रणं देत आहेत. काही ठिकाणी दारूबंदी केली जात आहे, तर काही लोक २२ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदीच्या मागण्या करत आहेत.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

हे सगळं सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते,' असं वक्तव्य केल्यामुळं मोठा गदारोळ उठला होता. त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केल्यानंतर हा वाद शांत झाला. शरद पवार यांनी आज या वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा आधार म्हणून त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. ते वाल्मिक रामायण सगळे वाचू शकतात. त्यांनी हे वक्तव्य करायची गरज नव्हती. त्यांनी तसं वक्तव्य केलं नसतं तर बरं झालं असतं. मात्र, त्यांनी रामाची अप्रतिष्ठा केली आहे असं मी मानत नाही, असं शरद पवार म्हणाले.

‘राम हा श्रद्धेचा विषय आहे. रामाचं स्थान देशातील जनतेच्या हृदयात आहे आणि आमचीही त्यावर श्रद्धा आहे. यापुढंही राहील,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार का?

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण आल्यास अयोध्येला जाणार का असा प्रश्नही शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यालाही पवार यांनी उत्तर दिलं. 'आतापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही. येईल असं वर्तमानपत्रातून समजतं आहे. पण २२ जानेवारीला तिथं गर्दी असेल. अशा परिस्थितीत मी जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर लोकांना तिथं पाठवण्याचा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. तो झाल्यावर कधीही मी शांततेत जाईन. त्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते स्वत: सीनियर सिटीझन!

शाळांमध्ये धार्मिक आग्रह योग्य नाही!

महापालिका शाळा व अन्य सरकारी शिक्षण संस्थांमध्ये रामावर निबंध व वर्त्कृत्व स्पर्धा घेण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. ‘माझ्याकडं काही शिक्षकांनी आजच तक्रार केली की मुंबईचे पालकमंत्री यात जास्त लक्ष घालतायत. पूर्ण शक्ती लावतायत. हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे. सगळ्या धर्मांबद्दल आस्था राखणारे लोक इथं आहेत. आमच्याही मनात सर्व धर्मांबद्दल आस्था आहे. त्यामुळं नव्या पिढीच्या मुलांच्या मनावर ठरवून काही बिंबवण्याचं काम करणं हे योग्य नाही,’ असं पवार म्हणाले.

WhatsApp channel