मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: शिवेसेनेचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?; संजय राऊत म्हणाले…
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut: शिवेसेनेचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?; संजय राऊत म्हणाले…

02 July 2022, 11:22 ISTGanesh Pandurang Kadam

Sanjay Raut: शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलं आहे.

Sanjay Raut Latest News: शिवसेनेच्या ३९ आमदारांना फोडून मुख्यमंत्रिपद मिळवलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक खासदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांनी आज ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) संजय राऊत यांची शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अपेक्षेप्रमाणे त्यांना ईडी चौकशीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, ‘पत्रा चाळ प्रकरणाशी माझा अजिबात संबंध नाही. खरं तर नुसत्या आरोपांवरून अशी चौकशी केली जाता कामा नये. मात्र, तपास यंत्रणांना वाटत असेल तर चौकशीला सामोरं जायला माझी हरकत नाही.’

शिवसेनेचे काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याबद्दल त्यांना विचारलं असता हे वृत्त खोटं असल्याचं राऊत यांनी सांगितलं. ज्या तीन खासदारांची नावं चर्चेत आहेत. त्यातले एक त्यांचे स्वत:चे चिरंजीव आहेत. इतर दोघांची माहिती घ्यावी लागेल. कोणाच्या मनात काही वेगळं येत असेल तर त्यांनी पक्ष प्रमुखांशी बोलावं. शिवसेनेत डरना मना है… जे होईल ते बघू. माझ्याकडंही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता. पण मी बिनधास्त चौकशीला सामोरा गेलो, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

'मूळ शिवसैनिक कोणाच्याही दबावाला, मोहाला बळ पडत नाहीत. त्यातले आम्ही आहोत. राज्यसभेच्या निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा माणूस आहे. वरवरचे बुडबुडे आम्ही नाही. बुडबुडे होते ते फुटले, असंही ते म्हणाले. 

फडणवीसांच्या नावापुढं उपमुख्यमंत्री लावणं जड जातंय!

देवेंद्र फडणवीस यांच्या नावासमोर उपमुख्यमंत्री हा शब्द लावताना मला जड जातंय. त्यांना आतापर्यंत मी भावी आणि माजी मुख्यमंत्री म्हणत आलोय, असा टोला संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात हाणला.