sanjay raut on chhagan bhujbal : ‘छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचं कुठलंही नातं राहिलेलं नाही. त्यांच्याशी आमचा कुठलाही संवाद नाही आणि होणार नाही. त्यामुळं त्यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेनेचे चांगलं चाललेलं आहे. भुजबळांना घेऊन आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या घरवापसीची चर्चा फेटाळून लावली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. ते वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. वांद्रे इथं झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना भूमिका घेण्याचा आग्रह केला आहे. तेव्हापासून ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत यांनी आज ही चर्चा खोडून काढली. 'कालपासून भुजबळांची जरा जास्तच चर्चा आहे. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. पण ते कोणत्या वाटेनं येतायत आम्हाला माहीत नाही, असं राऊत म्हणाले.
'छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता ते अजित पवार गटात आहेत. असा त्यांचा मोठा प्रवास आहे. शिवसेना सुद्धा आता खूप पुढं निघून गेली आहे. आता भुजबळ यांचं शिवसेनेशी नातं नाही. कुठलाही राजकीय संवाद नाही. होण्याची शक्यता नाही. त्यांनी एक मार्ग निवडला आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत. त्या भूमिका शिवसेनेच्या भूमिकांशी मेळ खाणाऱ्या नाहीत. त्यामुळं कुणी काही अफवा पसरवत असेल तर त्या चुकीच्या आहेत. आमची कोणाशीही चर्चा झालेली नाही, होणार नाही. शिवसेनेचं सगळं चांगलं चाललंय. आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
'शिवसेनेत असताना छगन भुजबळ हे मोठे नेते होते. आमचेही नेते होते. ते कुठल्याही एकाच पक्षात राहिले असते तर त्यांना कधीच मुख्यमंत्रिपदाचा टिळा लागला असता, असं राऊत म्हणाले.
'ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडलीय, मग त्यांना जाऊन ४० वर्षे होऊ द्या, ५० वर्षे होऊ द्या. त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना कधीही शांतता लाभलेली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे सगळे अस्वस्थ आत्मे आहेत, असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे पक्ष हे काही पक्ष नाहीत. ते गट आहेत. पावसाळा आला की जसे बेडूक येतात तसे हे गट आहेत. त्यांनी दोन-तीन-चार जागा जिंकल्या असतील, पण भविष्यात ते राहणार नाहीत, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या