सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांऐवजी स्टाफशी गप्पा मारून आले! अमित ठाकरेंच्या विरोधात लढण्यावर ठाम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांऐवजी स्टाफशी गप्पा मारून आले! अमित ठाकरेंच्या विरोधात लढण्यावर ठाम

सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांऐवजी स्टाफशी गप्पा मारून आले! अमित ठाकरेंच्या विरोधात लढण्यावर ठाम

Nov 01, 2024 01:30 PM IST

Sada Sarvankar : माहीम मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर सदा सरवणकर हे ठाम आहेत. माघार घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माझ्यावर प्रचंड दबाव आहे, पण… अमित ठाकरे यांच्या विरुद्ध लढणारे सदा सरवणकर काय म्हणाले?
माझ्यावर प्रचंड दबाव आहे, पण… अमित ठाकरे यांच्या विरुद्ध लढणारे सदा सरवणकर काय म्हणाले?

दादर-माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणारे सदा सरवणकर हे अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेणार का याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याची चर्चा आहे. मात्र, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला.

सदा सरवणकर हे काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. मात्र, शिंदे हे विश्रांती घेत असल्यानं त्यांच्याशी सरवणकरांची भेट होऊ शकली नाही. शेवटी तिथल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारून सरवणकर परतले. मीडियाशी बोलताना त्यांनी स्वत: ही माहिती दिली.

उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही!

'मी उमेदवारी मागे घेणार नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे. आज पुन्हा तेच सांगतो. माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी महायुतीचा उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि प्रचारालाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेवर जाण्याचा कुठलाही विषय नाही, असं सरवणकर म्हणाले.

माझ्यावर प्रचंड दबाव आहे हे खरं आहे. पण तो माघार घेण्यासाठी नाही तर निवडणूक लढण्यासाठी आहे. मतदार आणि कार्यकर्ते माझ्यावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकत आहेत. दिवसातून १०० फोन येतात, त्यातील ८० फोन हे मला पाठिंबा देणारे आणि निवडणूक लढवाच असं सांगणारे असतात, असं सरवणकर म्हणाले.

सरवणकर यांनी उडवली अमित ठाकरेंची खिल्ली

मनसेच्या पाठिंब्यानं राज्यात भाजपचं सरकार येईल. मनसे सत्तेत असेल असं विधान राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलं होतं. त्याची सरवणकर यांनी खिल्ली उडवली. 'ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद आहे, असं सरवणकर म्हणाले.

महायुतीचा धर्म पाळणार असं फडणवीस म्हणालेत!

अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकरांनी माघार घ्यावी असे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांचीही तशी इच्छा आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असं विचारलं असता, सरवणकर म्हणाले, तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखादी गोष्ट दाखवता किंवा टाळता. नागपूरमध्ये फडणवीस जे बोलले ते तुम्ही विचारात घेत नाही. 'महायुतीचा उमेदवार तो आमचा उमेदवार. महायुतीचा धर्म आम्ही पाळू, असंही ते म्हणाल्याचं सरवणकर यांनी सांगितलं.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर