Uddhav Thackeray questions Narendra Modi : ‘जिथं काहीच होत नाही, तिथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगेच्या बाता मारता, मग बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना काय करत आहात? विश्वगुरू नुसते पाहत काय बसले आहेत? तिथं धमक का दाखवत नाहीत?; असा बोचरा सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
'मातोश्री'वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली. त्यामुळं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'बांगलादेशात हिंदूंवर अन्याय-अत्याचार होत आहेत. बांगलादेशच्या क्रिकेट संघाबरोबर खेळण्यास आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र केंद्र सरकारनं त्यावर काहीच भूमिका घेतली नाही. आताही गप्पच आहे. बांगलादेशात इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. इस्कॉनच्या प्रमुखांना अटक झाली तरीही सरकार गप्प आहे. अशा लोकांच्या हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
'जसं विश्वगुरूंनी एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, त्याचप्रमाणे बांगलादेशात हिंदूवर होणारे अत्याचार का थांबवत नाही? जिथं काही नाही तिथं छाती फुगवून दाखवू नका. जिथं अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवा, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
'शेख हसीना इथे आल्या त्या सुरक्षित आहेत. मात्र बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंचं काय? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पाहिजे. बांगलादेशात इस्कॉनचं मंदिर जाळलं आणि इथं सिडकोचा डोळा मंदिराच्या जागेवर अशा बातम्या येत आहेत. हा भूखंड कोणाला जाणार हे स्पष्ट आहे कारण हल्ली एकाच व्यक्तीला सगळं दिलं जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-अदानी कनेक्शनकडंही बोट दाखवलं.
'हमालांनी बांधलेलं दादर इथलं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी भाजप सरकारनं नोटीस पाठवली आहे. ८० वर्षांपूर्वींचं मंदिर पाडायला निघाले आहेत यांचं हिंदुत्व कुठं आहे? यांचं हिंदुत्व फक्त मतांपुरतंच उरलं आहे का? हिंदूंना भयभीत करायचं आणि त्यांची मतं घ्यायची. आता मंदिरं सेफ नाहीत मग कुठे गेलं यांचं हिंदुत्व, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.