Uddhav Thackeray On Vote Jihad : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीवर 'व्होट जिहाद'चा आरोप केला होता. या आरोपाला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. व्होट जिहाद म्हणजे काय हे भाजपनं आधी लहानपणी ‘ताजिया’च्या खालून गेलेल्या मोदींना विचारावं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणित महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. या पराभवाचा विश्लेषण करताना भाजपकडून महाविकास आघाडीवर वेगवेगळे आरोप होत आहेत. त्यात ‘व्होट जिहाद’चा आरोप प्रमुख आहे. मुस्लिम मतदारांच्या अनुषंगानं हा आरोप केला जात आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांनी तर मतदारसंघनिहाय आकडेवारीही सोशल मीडियावर शेअर केली आहे. मराठी मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतं दिली नाहीत. एका विशिष्ट वर्गानं दिली असं भाजपवाले सांगत आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सगळ्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. व्होट जिहाद म्हणजे काय?, असा प्रश्न त्यांनी सुरुवातीलाच केला. स्वत: नरेंद्र मोदी यांचं बालपण मुस्लिम कुटुंबीयांच्या सानिध्यात गेलंय. ईदच्या मिरवणुकीत ते ताजिया खालून जायचे. मुस्लिमांच्या घरचं जेवण ते जेवले आहेत असं ते स्वत:च सांगतात. मग मुस्लिमांच्या त्या खाल्ल्या मिठाला ते जागले की नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.
इंडिया आघाडीनं खोटं नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप भाजप व एनडीएकडून केला जात आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. 'आम्ही खोटं नरेटिव्ह सेट केलं असं म्हणतात तर आमच्या विरोधात मोदी जे बोलत होते ते काय होतं? इंडिया आघाडीला मत दिलं तर ते तुमची संपत्ती जास्त मुलं असणाऱ्यांना वाटतील, तुमची मंगळसूत्रं घेऊन जातील. तुमच्या म्हशी घेऊन जातील. तुमच्या घरातले नळ कापून नेतील, वीज कापतील हे खरं नरेटिव्ह होतं. नकली संतान, नकली सेना हे खरं नरेटिव्ह होतं. प्रत्येकाला घर देईन, प्रत्येकाला नोकरी देईन, उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी दिला. हे नरेटिव्हचं सोडून द्या, खरेटिव्हवर बोला, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी केला.
देशाची एकूण लोकसंख्या लक्षात घेतली आणि त्यातून मतदारांचा आकडा काढला तर भाजपला देशातील किती लोकांनी मतं दिली आणि मोदींच्या विरोधात इतर पक्षांना किती दिली याची खरी टक्केवारी समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.