ED Raids Thakur Brothers in Chandrapur: महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात सफारी शुल्क वसूल करणाऱ्या कंपनीच्या प्रवर्तकांवर राज्य सरकारशी १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी छापे टाकले. वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स म्हणजेच डब्ल्यूसीएस या कंपनीचे मालक अभिषेक विनोद कुमार ठाकूर आणि रोहित विनोद कुमार ठाकूर आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील सात ठिकाणांवर ८ ते ९ जानेवारी दरम्यान ईडीने छापे टाकले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने डिसेंबर २०२१ च्या सेवास्तरीय कराराद्वारे पर्यटकांना प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मार्गदर्शक शुल्क गोळा करण्यासह अखंडित सेवा पुरविण्यासाठी डब्ल्यूसीएसची नेमणूक केली होती. मात्र, कंपनी मालकांनी करारातील अटींचे उल्लंघन करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन फाऊंडेशनची २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केली, असे ईडीने म्हटले आहे.
चंद्रपूर पोलिसांनी मालक आणि कंपनीविरोधात आर्थिक गैरव्यवहारकरून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डब्ल्यूसीएसच्या संचालकांनी फसवणुकीने मिळवलेल्या रकमेचा वापर वैयक्तिक मालमत्तांच्या संपादनासाठी आणि इतर संस्थांच्या नावे घेतलेल्या मागील कर्जाची परतफेड करण्यासाठी केला, असा दावा एजन्सीने केला आहे. या छाप्यांमध्ये सोने, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने आणि सोन्यासह मालमत्तेची कागदपत्रे असा एक कोटी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीची ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ताडोबा-अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनच्या माध्यमातून वेबसाईट सुरू करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी ठाकूर यांच्या डब्ल्यूसीएस कंपनीशी करार झाला. या कंपनीच्या निगराणीखाली ऑनलाइन सफारी बुकिंग केली जात होती.करारानुसार, याचे कमिशन ठाकूर बंधूंच्या कंपनीला मिळत होते. दरम्यान, २०२० ते २०२३ या कालावधी कंपनीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे २२ कोटी २० लाख रुपये जमा करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने केवळ १० कोटी ६५ लाख जमा केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनने उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली असता ठाकूर बंधूंनी उडवाउडवीचे उत्तर दिली. यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनने रामनगर पोलीस ठाण्यात ठाकूर बंधू विरोधात तक्रार दिली. याप्रकऱणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
ठाकूर बंधूंच्या सरकारनगर येथे घरी धाड टाकण्यात आली, यावेळी हे दोघेही घरी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच ठाकूर बंधू यांच्या मालकीच्या स्वाद बीअर बार, स्वाद कॅफे, बेकरी आणि इतर ठिकाणी देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या