Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी विरोधी महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीने १७ आणि एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, विधानसभेच्या ३१ जागांवर पराभव आणि विजयाचे अंतर ५००० मतांपेक्षा कमी होते. यापैकी १६ विधानसभा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते तर १५ जागांवर सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते.
निवडणूक आकडेवारी आणि मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १५८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही आघाडीत ३३ जागांचा फरक आहे. ज्या मतदारसंघात उमेदवारांनी पाच हजारांपेक्षा कमी मतांनी आघाडी घेतली होती, त्यामध्ये अंधेरी पश्चिम, मालाड, पश्चिम मुंबई, पालघरमधील डहाणू आणि बीडमधील माजलगाव या मतदारसंघांचा समावेश होता.
या ३१ जागा अशा आहेत की, ज्यांचे निकाल राजकीय वाऱ्याची दिशी बदलू शकतात. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा पॅटर्न आणि निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. असे असले तरी राज्यातील दोन्ही आघाडींमधील लढत अटीतटीची असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सहा महिन्यांच्या आत या निवडणुका झाल्या असून राज्यातील राजकीय परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच असल्याने पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्याने विधानसभेच्या केवळ ३१ जागाच दोन्ही आघाडीला पुन्हा सत्तेपर्यंत पोहोचवू शकतात. या ३१ जागांवर जी आघाडी मजबूत दिसेल सत्तेचा कौल त्याच्या बाजुने झुकू शकते.
विधानसभेच्या या ३१ जागांपैकी भाजपने ९, शिवसेनेने ५ आणि राष्ट्रवादीने एका जागेवर आघाडी घेतली आहे, तर विरोधी गटातून काँग्रेसने ८, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने २ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप ११ जागांवर पिछाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागात महायुती मागासलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ७० पैकी ३० जागांवर महायुती, विदर्भात ६२ पैकी १९ आणि मराठवाड्यात ४६ पैकी ११ जागांवर महायुती आघाडीवर आहे. उत्तर महाराष्ट्र, ठाणे आणि कोकणात महायुतीने चांगली कामगिरी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारख्या मतदान पद्धतीची पुनरावृत्ती झाल्यास सत्ताधारी आघाडीला अडचणीचे ठरू शकते. २०२२ आणि २०२३ मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे, तर सत्ताधारी महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे.