मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan : काँग्रेस का सोडली?; अशोक चव्हाण यांनी सांगितलं कारण

Ashok Chavan : काँग्रेस का सोडली?; अशोक चव्हाण यांनी सांगितलं कारण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 12, 2024 04:07 PM IST

Ashok Chavan Reaction on Resignation : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या व आमदारकीच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Why Ashok Chavan resigns from congress
Why Ashok Chavan resigns from congress

Ashok Chavan Reaction on Resignation : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबईत ते आज पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नावर थेट काही बोलण्याचं चव्हाण यांनी टाळलं. ‘प्रत्येक निर्णयामागे कारण असलंच पाहिजे असं नाही आणि प्रत्येक कारण जाहीरपणे सांगितलंच पाहिजे असं नाही. जोपर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो, तोपर्यंत पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. आता काही तरी वेगळा पर्याय चाचपून पाहावा असं वाटल्यानं मी बाजूला होत आहे,' असं ते म्हणाले.

नाराजीचं कारण काय या प्रश्नावरही ते बोलले नाहीत. 'मला कोणाचीही तक्रार करायची नाही. पक्षांतर्गत गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपमध्ये जाणार का?

भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चेवरही चव्हाण यांनी मत मांडलं. 'मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मला निर्णय घेण्यासाठी वेळ हवा आहे. येत्या दोन दिवसांत माझा निर्णय जाहीर करेन, असं चव्हाण यांनी सांगितलं.

तुमच्यासोबत किती आमदार?

अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ती चर्चा चव्हाण यांनी फेटाळून लावली. 'मी कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. मी कोणालाही फोन केलेला नाही. आमदार काय निर्णय घेतील ते मला माहीत नाही, असं ते म्हणाले.

नाना पटोले यांच्या टीकेवर प्रतिक्रिया

काँग्रेसनं अनेक लोकांना खूप काही दिलं. आज काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी लढत असताना सर्व काही मिळालेले नेते पक्षाला सोडून जात आहेत हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. त्याला चव्हाण यांनी उत्तर दिलं. 'काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना खूप काही दिलं हे खरं आहे, पण अशोक चव्हाण यांनीही पक्षाला खूप काही दिलं हेही तितकंच खरं आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.

WhatsApp channel