Anna Hazare on PM Manmohan Singh death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘मनमोहन सिंग यांंचं देशाच्या जडणघडणीत योगदान होतं. त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील,’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन केलं होतं. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर ठाण मांडलं होतं. २००९ साली देशातून काँग्रेसचं सरकार जाण्यात या आंदोलनाचा मोठा वाटा होता. सध्याच्या सरकारवर टीका करताना विरोधक अनेकदा सध्या परिस्थितीबद्दल अण्णा हजारे यांनाही दोषी धरतात.
आता खुद्द अण्णा हजारे यांनीच मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे. ‘माणसं जन्माला येतात, जातात. अनेक जण लक्षातही राहत नाहीत. पण काही जण स्वत:च्या कामाचा ठसा उमटवून जातात. आपल्या आठवणी मागे ठेवतात. समाजासाठी काहीतरी करून जातात. मनमोहन सिंग यांना समाज आणि देश कधीच विसरणार नाही. मनमोहन हे देशाचा विचार करणारे नेते होते. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था अमूलाग्र बदलून टाकली. देशाला दिशा दिली. त्यामुळंच आजही देश प्रगतीपथावर आहे,’ असं अण्णा हजारे म्हणाले.
'दिल्लीत आम्ही जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करत होतो. त्यावेळी दोन वेळा त्यांच्या घरी बैठक झाली होती. आमच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी चटकन निर्णय घेतले होते. समाज आणि देशासाठी आस्था, प्रेम असणारे ते व्यक्तिमत्व होते. आज ते शरीरानं आपल्यातून गेले आहेत, मात्र त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील, असं अण्णा हजारे म्हणाले.
मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. सिंग यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांना जगभरातून आदरांजली वाहिली जात आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
हेही वाचा: मनमोहन सिंग यांच्या तीन मुली काय करतात?
संबंधित बातम्या