Western Railway : लोकल रेल्वे ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. रोज लाखो मुंबईकर नोकरी व कामधंद्यानिमित्त लोकलने प्रवास करत असतात. पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावर लोकलमधील वाढती गर्दी लक्षात घेता या मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेवर एसी लोकलही सुरु करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवाशाच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेने बुधवारपासून (२७ नोव्हेंबर) १३ नव्या एसी लोकल सुरु केल्या आल्या. मात्र पहिल्याच दिवशी या वातानुकुलित लोकलमुळे प्रवाशांमध्य़े गोंधळाची स्थिती पाहाय़ला मिळाली.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात बुधवारपासून १३ वातानुकुलित लोकल रेल्वे ट्रेनची भर पडली. मात्र गर्दीच्या वेळी नियमित लोकल ट्रेन ऐवजी एसी लोकल सोडल्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नियमित लोकलऐवजी एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आल्याने प्रवाशांना ती गाडी सोडाली लागली. त्यानंतर धावणाऱ्या साध्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटीत प्रवाशांना आपला प्रवास करावा लागला.
पश्चिम रेल्वे मार्गावर १३ नवीन एसी लोकल सुरू झाल्या असून त्यातील ५ सकाळच्या सत्रात तर ४-४ एसी लोकल दुपार व साय़ंकाळच्या वेळी सोडण्यात येत आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी भाईंदरवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या एसी लोकलनंतर धावणाऱ्य़ा साध्या लोकलमध्ये गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात साध्या लोकल रद्द न करता एसी लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
त्याचबरोबर साध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्य़ा एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांहून अधिक आहे. त्याचबरोबर या एसी लोकल साध्या लोकलच्या जागी चालवल्या जात असल्य़ाने एसी लोकलचे प्रवासभाडे साध्या लोकलच्या प्रथम क्षेणीप्रमाणे असावे अशीही मागमी होत आहे.
पश्चिम रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार १२ नॉन एसी लोकलचं एसी लोकलमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. या एसी लोकल आठवड्यातील सातही दिवस धावणार आहेत. लोकलच्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वेस्टर्न रेल्वेवर दिवसभर लोकल रेल्वेच्या एकूण १४०६ फेऱ्या होणार असून त्यामध्ये एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या १०९ आहे.
या १३ नव्या एसी लोकलपैकी ६ अप मार्गावर तर ७ डाऊन मार्गावर धावणार आहेत. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेट अप मार्गावर प्रत्येकी २ तर विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरी मार्गावर प्रत्येकी १ लोकल धावेल. तर डाऊन मार्गावर चर्चगेट-विरार मार्गावर दोन तर चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर,महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदर मार्गावर प्रत्येकी एक रेल्वे धावणार आहे.