पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर गणेशोत्सवकाळात फळाला आली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या दरम्यान द्विसाप्ताहिक नियमित एक्स्प्रेस सुरू केली आहे. आज, गुरुवारी बोरिवलीहून मडगावसाठीची उद्घाटनाची ही विशेष एक्स्प्रेस दुपारी दीड वाजता रवाना झाली आहे.
पश्चिम रेल्वेने कोकणासाठी १५ डब्यांची विशेष गाडी तयार केली असून २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बोरिवली येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोघांनी गणपती उत्सवासाठी अशीच एक गाडी सुरू करण्याची घोषणा केली होती. राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर घोषणा केल्यानंतर सुरुवातीला मेमू ट्रेन (इंटरसिटी लोकल ट्रेन) चालवण्याची ही योजना होती, जी नंतर मागे घेण्यात आली.
नियमित सेवा म्हणून वांद्रे टर्मिनस येथून मडगावपर्यंत आठवड्यातून दोन वेळा ही २० डब्यांची ही गाडी धावणार आहे.
बोरिवलीत पहिल्यांदाच कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळणार आहे. वांद्रे टर्मिनस आणि मडगाव येथून सुटणाऱ्या या गाडीला बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी आदि १३ थांबे असतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की गाडी १४ तास ३५ मिनिटात मडगावला पोहोचणार आहे. गाडीचा सरासरी वेग ४२ किमी प्रति तास असेल आणि ६०४ किमीचा प्रवास करेल.
मुंबईहून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मध्य रेल्वे स्थानकांवरून चालविल्या जात असल्याने वांद्रे टर्मिनस येथून गोव्याकडे जाणारी रेल्वे सुरू केल्यास मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वेकडे कोकणाकडे जाणारी गाडी असावी, अशी आमची अनेक दिवसांपासून मागणी होती. हे यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद आहे,' असे वसईचे रहिवासी आणि तेथील रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य सी. नाईक यांनी सांगितले.
गाडी क्रमांक १०११६/५ मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही रेल्वेगाडी धावणार आहे. ही एक्स्प्रेस २० डब्यांची आहे. ही गाडी दर मंगळवार आणि गुरुवारी मडगावहून सकाळी ७.४० वाजता सुटेल आणि रात्री ११.४० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६.५० वाजता सुटेल आणि रात्री १० वाजता मडगावला पोहोचेल, असे रेल्वेच्या अधिसूचनेत म्हटले आहे. हे २० एलएचबी (लिंक हॉफमन बुश) प्रकारच्या कोचसह चालविले जाईल, जे प्रवासी सुरक्षा, आराम आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहे.