मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gadakh-Ghule Wedding : कट्टर राजकीय वैरी झाले व्याही; गडाख-घुले कुटुंबियांचं सोनईत मनोमिलन

Gadakh-Ghule Wedding : कट्टर राजकीय वैरी झाले व्याही; गडाख-घुले कुटुंबियांचं सोनईत मनोमिलन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 22, 2023 07:32 PM IST

Udayan Shankarrao Gadakh Wedding : माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्या निवेदिता घुले यांचा विवाहसोहळा आज सोनईत पार पडला आहे.

Udayan Shankarrao Gadakh Wedding
Udayan Shankarrao Gadakh Wedding (HT)

Gadakh-Ghule Wedding In Sonai : एकाच पक्षात असतानाही गेल्या दशकापासून एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे माजी मंत्री शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले हे नेते आज व्याही झाले आहे. नेवाश्याचे आमदार शंकरराव गडाख यांचे चिंरजीव उदयन गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता घुले यांचा विवाहसोहळा मोठा थाटात सोनईत पार पडला आहे. यावेळी लग्नसोहळ्यात राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत नवदाम्पत्यांना आशिर्वाद दिले आहेत. त्यामुळं आता या शाही विवाहसोहळ्याची राज्यभरात चांगलीच चर्चा होत आहे.

शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले हे अहमदनगरमधील बडे राजकीय नेते. दोन्ही नेते राष्ट्रवादीत असताना त्यांचे नेहमीच मतभेद व्हायचे. नेवासा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शेवगाव तालुका पाथर्डी मतदारसंघात समाविष्ट झाला. परंतु तरीदेखील दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर काही संपलेलं नव्हतं. परंतु आता झालं गेलं विसरून दोन्ही नेते व्याही झाले आहेत. गडाख यांचे चिंरजीव उदयन आणि घुलेंच्या कन्या निवेदीता यांचा शाही विवाहसोहळा सोनईत पार पडला आहे. या लग्नसोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अशोक बापू पवार, आमदार आशुतोष काळे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मोनिका राजळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

विवाहसोहळ्याच्या निमित्तानं गडाख आणि घुले कुटुंबीय एकत्र आल्यामुळं आता नेवासा आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार आहे. कारण गडाख यांचा मुळा सहकारी कारखाना तर घुले यांचा भेंडा सहकारी कारखाना असल्यामुळं दोन्ही नेत्यांची आपापल्या मतदारसंघावर मजबूत पकड आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढणारी दोन घराणी आज नातेसंबंधात बाधली जात असल्यामुळं नगरमधील राजकीय समीकरणं बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

WhatsApp channel