Maharashtra Weather News: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमान घट झाली असून बहुतेक ठिकाणी तापमान २० अशं सेल्सिअसच्या खाली गेले आहे. याशिवाय, राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटसह हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. नाशिक, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पारा १८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर येथे काल १५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, सोलापूर, जळगाव, पुणे, सांताक्रूझ, डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वर्धा येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. दिवाळीनंतरच थंडीला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
राज्यात उत्तर भारतातून काही प्रमाणात थंड वारे येत आहेत. तर, ईशान्य वारे राज्यावर येताना बंगालच्या उपसागरातून बाष्प सोबत आणत आहेत. या दोन्ही वाऱ्यांचा मिलाफ दक्षिण महाराष्ट्रावर होत आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे.
पुणे ३४.२ (१८.९), अहिल्यानगर ३२.८ (१६.५), जळगाव ३४.३ (१७.८), कोल्हापूर ३१.६ (२२.८), महाबळेश्वर २८.८ (१५.४), मालेगाव ३२.४ (२०), नाशिक ३४.१ (१९.१), निफाड ३३.३ (१६.४), सांगली ३२.७ (२१.४), सातारा ३२.७ (१८.२), सोलापूर ३४.७ (२२.९), सांताक्रूझ ३४.२ (२५.६), डहाणू ३४.२ (२४.२), रत्नागिरी ३२.८ (२४.८), छत्रपती संभाजीनगर ३४.१ (१८.९), बीड ३२.६ (१७.५), धाराशिव ३३ (१९), परभणी ३३.९ (२०.५), अकोला ३४.१ (२०.४), अमरावती ३५ (१९.५), भंडारा ३० (२२), बुलडाणा ३१.५ (२२), ब्रह्मपुरी - (२४.४), चंद्रपूर ३३ (२१), गडचिरोली ३२ (२१.२), गोंदिया ३३.२ (२२.२), नागपूर ३३.७ (२१.४), वर्धा ३४ (२१.४), वाशीम ३३.६ (-), यवतमाळ ३२.५ (१९.५).