राज्यातील अनेक जिल्ह्यांत पारा ४० अंशापेक्षा जास्त झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच आता नाशिक व धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्याने घामाच्या घारा काढणाऱ्या उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसाने शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासच ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
लासलगाव, चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार सरी बरसल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशापेक्षा अधिक वाढल्याने उकाडा वाढला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि पावसाचा हलका शिडकाव झाल्याने वातावरण आल्दाददायक झाले आहे. मालेगावचा पारा गुरुवारी ४२ अंशावर पोहोचला होता. या अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी बळाराजा धास्तावला आहे.
पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणातील तापमानात काहीशी घट झाली आहे. तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरण असल्याने उष्म्यात वाढ झाली आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.