Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Published Jun 08, 2024 07:32 AM IST

Maharashtra Weather Updates: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत आज हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (PTI)

Maharashtra Forecast: महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २९ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नैरृत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले असून राज्यातील अनेक भागांना तीव्र उष्णता आणि तीव्र पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. येत्या ९ ते १० जूनदरम्यान मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक भागांत पाणीटंचाईसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील ११ हजार ५६५ गावांना सरकारी आणि खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात १० जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात ६ ते ९ जूनदरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, ९ जून २०२४ रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, कर्नाटक, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १० जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये ९ जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ९ आणि १० जून रोजी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, बिहार आणि ओडिशामध्ये १० जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची अपेक्षा आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये ८ ते १० जून दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

आयएमडीने बुधवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, पुढील पाच दिवसांत कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ५, ८ आणि ९ जून रोजी किनारपट्टीकर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर