Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

May 18, 2024 11:44 PM IST

weather forecast : ईशान्य राजस्थानपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत द्रोणीय स्थिती असून त्याची तीव्रता कायम आहे. याशिवाय मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत मोसमी वाऱ्यासाठी अनुकूल स्थिती आहे. राज्यातील काही जिल्ह्यात येत्या २४ मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार
राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार

Weather Update In Maharashtra : राज्यातील अनेक भागात उकाड्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीचा मुक्काम राज्यात पुढील आठवड्यातही कायम राहणार आहे. २४ मेपर्यंत मराठवाडा, विदर्भात सर्वांधिक पाऊस पडणार असून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील कमाल तापमानात घट झाली असली तरी उकाडा आणि उष्णतेच्या झळा कायम आहेत. राज्यात शनिवारी जळगाव येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहणार आहे. मात्र, या भागात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस कमी झाला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत या भागातील काही जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी सुरू असल्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. तरीदेखील दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर पावसाची हजेरी, तर रात्रभर उकाडा अशी स्थिती कायम आहे.

ईशान्य राजस्थानपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत द्रोणीय स्थिती असून त्याची तीव्रता कायम आहे. याशिवाय मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत मोसमी वाऱ्यासाठी अनुकूल स्थिती आहे. यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून विजांच्या कडकडाट  व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २४ मे पर्यंत नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला,  अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये अवकाळी बरसणार आहे तर जळगाव, पालघर, ठाणे,  मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  नाशिक,  नगर,  सांगली,  कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पुढील दोन दिवसात पाऊस बरसणार आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

वायव्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, तर २४ मे रोजी बंगालच्या उपसागरातील याच कमी दाबाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. ते मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत असणार आहे. या दोन्ही स्थिती मोसमी वारे दाखल होण्यास अनुकूल आहेत. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये वेळेपूर्वीच मोसमी वारे दाखल होतील, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर