Weather News: महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज (१९ जुलै २०२४) अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्धा यासह इतर आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आले. ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांतील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, रेड अलर्ट जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती सर्वात वाईट असेल. यातील बहुतेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे अपेक्षित आहेत. मुसळधार पावसामुळे पिकांचे, पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून या भागांत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मदत शिबिरे स्थापन केली आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत येत्या २२ जुलैपर्यंत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत एकूण १०१ मिमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात गुरुवारी कोकण- गोवा विभागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बहुतांश भागात गुरुवारी आणि शुक्रवारी ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २० आणि २१ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४५ किमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या तारखांना मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.