महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आज (१ एप्रिल) काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून कमाल तापमान काही अंशी कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात पावसाने अचानक हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
येत्या २४ तासांत राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात विदर्भातील ११ जिल्हे कोरडे राहतील. तीन दिवस विदर्भात पाऊस पडणार नाही. ४ एप्रिल रोजी अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ५ एप्रिल रोजी चंद्रपूर व अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल. येत्या तीन दिवसात किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ ते ४३ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढणार असून अन्य कोणतेही बदल होणार नसल्याचे हवमान विभागाने सांगितले आहे.