Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या महिन्यात थंडी, ऊन व पावसाचा खेळ सुरू आहे. बहुतांश भागात थंडीचा प्रकोप कमी झाला आहे. तर तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरी सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. पुढील काही दिवसांत राज्याचे हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चार सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने याच परिणाम हवामानावर झाला आहे. थोड्या थोड्या वेळाने हवामानात मोठा बदल होत आहे. सकाळी थंडी तर दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तर काही वेळा ढगाळ हवामान देखील पडत आहे. ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किमान तापमानात ६-१० डिग्रीपर्यंत वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे.
राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. मराठवाडा व विदर्भातील काही भागात तापमान कमी असले तरी दुपारी मात्र, तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचा काही भागात ढगाळ हवामान आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहणार आहे.
उत्तर भारतात देखील थंडीची लाट काहीशी कमी होताना दिसत आहे. नवी दिल्लीत सोमवारी तापमानात वाढ झाली होती. कमाल तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा पाच अंशांनी जास्त आहे. दिल्लीत १९ जानेवारी रोजी २६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जो जानेवारीतील सहा वर्षांतील सर्वात उष्ण दिवस होता. यापूर्वी जानेवारीत दिल्लीत कमाल तापमान २१ जानेवारी २०१९ रोजी २८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.
हवामान खात्याने मंगळवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी काही भागात थंड वारे वाहत होते, ज्याचा वेग ताशी ६ किलोमीटरपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश भागात दाट धुके पसरले होते. सायंकाळ आणि रात्री धुके आणि हलके धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान, दिल्लीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५ आणि ११ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे राजस्थानच्या अनेक भागांत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात हवामान सामान्यत: कोरडे होते. राज्याच्या अनेक भागांत दाट धुके पसरले आहे. पाली येथे ६.८ अंश सेल्सिअस, जैसलमेर व गंगानगर येथे ८.९ अंश सेल्सिअस, पिलानी येथे ९.२ अंश सेल्सिअस, सिरोही येथे ९.३ अंश सेल्सिअस आणि अलवर येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्याची राजधानी जयपूरमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या पश्चिम विक्षोभाचा प्रभाव दिसणार आहे. २२ जानेवारीला जयपूर, भरतपूर आणि बिकानेर विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या