मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: मुंबईसह ३ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Maharashtra Rain: मुंबईसह ३ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 09, 2022 07:54 AM IST

Maharashtra Rain: येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Rain:राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात नद्या पात्राबाहेर पडल्या असून काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ३ ते ४ तासात ४० ते ५० किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. अद्याप लोकलसेवा सुरळीत सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मध्यरात्री मुंबईसह उपनगरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला.

हवामान विभागाने राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यातील अनेक भागात मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

IPL_Entry_Point