मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसानंत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने सरासरी तापमानात घट झाली आहे. मात्र, मुंबईत तीन दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला असल्याने मुंबईकर उन्हामुळे त्रस्त झाले आहेत. बुधवारी मुंबईचे तापमान हे ३५ अंशांच्या वर होते. दरम्यान, पाऊस झाला नसल्याने मुंबईत तापमानात देखील घट झालेली नाही.
मुंबईत बुधवारी ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.आज गुरुवारी देखील तापमान वाढलेले राहणार आहे. ११ मे रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर १२ मे रोजी ३५.२ अंश सेल्सिअस होते. मुंबईच्या दिशेने येणारे वारे उत्तर आणि वायव्य दिशा येथून वाहत असल्याने बुधवारी तापमानात आणखी वाढ पाहायला मिळाली. आज देखील मुंबईत कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये रविवारपर्यंत कोरडेच वातावरण राहणार आहे. रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मात्र हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये २ ते ३ अंशांनी वाढू शकते. कोकण आणि गोव्यामध्ये उष्ण आणि आर्द्र वातावरण निर्माण होऊ शकते. विदर्भात मात्र कमाल तापमानात फारसा बदल नसून तीन दिवसांनी दोन ते चार अंशांनी कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी अकोला ४३.७, अमरावती ४३.४, वर्धा ४३.०, जळगाव ४२.७, परभणी ४२.७, मालेगाव ४२.६, सोलापूर ४२.५, जेऊर ४२.०, नांदेड ४१.६, नाशिक - ३९.३ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.