मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नामांतराविरोधातील आंदोलन मागे घेणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील सरकारवर भडकले
MP Imtiyaz Jaleel Live
MP Imtiyaz Jaleel Live (HT)

नामांतराविरोधातील आंदोलन मागे घेणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील सरकारवर भडकले

10 March 2023, 20:19 ISTAtik Sikandar Shaikh

MP Imtiyaz Jaleel Live : राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नसल्याचं वक्तव्य खासदार जलील यांनी केलं आहे.

MIM Protest In Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. तसेच एमआयएमकडून शहरात कँडल मार्च काढून नामांतराला विरोध करण्यात आला आहे. त्यानंतर आता परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह तब्बल १५०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही, असं म्हणत खासदार जलील यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, पोलिसांनी राजकीय दबावापोटी माझ्यासहित १५०० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही, त्यामुळं कितीही गुन्हे दाखल झाले तरी आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं खासदार जलील यांनी म्हटलं आहे. नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे खासदार जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. काल संध्याकाळी एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. परंतु तरीदेखील जलील यांनी मोर्चा काढल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नामांतराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदची हाक...

औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आल्यानंतर एमआयएमकडून शहरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण जारी आहे. त्यामुळं आता नामांतरावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.