Chhagan Bhujbal On OBC : राज्यात ओबीसी आणि मराठा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहे. काल छगन भुजबळ यांनी समता परीक्षेची बैठक झाल्यावर मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देत ओबीसीतून आरक्षण देण्यास पुन्हा विरोध केला आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागेल, अशी मागणी करत या साठी समता परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे भुजबळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोनल सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या संकुलात राज्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची व समता परीक्षेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वरील वक्तव्य केले.
छगन भुजबळ म्हणाले, अनुसूचित जाती व जमातीला ज्याप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळतो, तसा ओबीसींना मिळत नाही. त्यामुळे जातवार जनगणना झाली पाहिजे. खोट्या पुराव्यावर ५७ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली गेली आहेत. जर ओबीसीविरोधात निर्णय झाले, तर आंदोलन करणार, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.
भुजबळ म्हणाले, बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसे सर्वेक्षण राज्यात देखील व्हायला हवे. यासाठी समता परीक्षेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. आमच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या रॅली झाल्या त्या कशासाठी झाल्या? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. हे आम्हीच नाही तर यापूर्वी चार आयोग होते त्यांनी देखील मान्य केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने देखील या बाबत नकार दिला आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत समता परिषदेचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचा आढावा घेण्यात आला. या संबंधित अनेक प्रश्नावर चर्चा झाली. या बैठकीत जातीगणना करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली, असल्याचे छगन भुजबळ म्हणाले
संबंधित बातम्या