Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या पायाला दुखापत झाली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना काल डिस्चार्ज करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन जणांना भांडूपमधून ताब्यात घेतले जात आहे. नुकतीच संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हल्ला करणाऱ्यांची नावे मला कळाली असून त्यांना आता सरंक्षणाची गरज आहे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
"माझ्यावर कुणी हल्ला केला हे मला माहीत आहे. आम्हाला त्यांची नावे कळली आहेत. माझ्यावर हल्ला ज्यांनी केला त्यांना संरक्षण द्या. सरकारने त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी", असा सूचक इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
पुढे संदीप देशपांडे म्हणाले की, "मी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात पत्रे पाठवले आहे. या महामारीच्या काळातील घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी करण्यात यावी. शक्य नसेल तर मग आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागावर चौकशीची जबाबदारी सोपवावी. ही चौकशी होऊ नये म्हणून माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. मी पुढच्या आठवड्यात पुन्हा पालिका आयुक्तांची भेट घेणार असून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे."
दरम्यान, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनद्वारे माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी मला सरंक्षण दिले. पण मी कोणालाही घाबरत नाही. कोणत्याही धमक्यांना भीक घालत नसून मला संरक्षणाची गरज नाही. त्यामुळे मी संरक्षण नाकारले आहे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या