Pune BJP against Ajit Pawar : अजित पवार यांना भाजपनं महायुतीत घेण्याची गरज नव्हती असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून व्यक्त करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकारीही मनातील खदखद व्यक्त करू लागले आहेत. अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातच भाजपमधून त्यांना विरोध होत आहे. अजित पवार महायुतीत नकोच, अशी भावना भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
शिरूर लोकसभेच्या आढावा बैठकीत सुदर्शन चौधरी बोलत होते. आमदार राहुल कुल व अन्य पदाधिकाऱ्यांच्या समोरच चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली. चौधरी यांच्या भूमिकेला उपस्थित कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढून टाका हेच पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांचं मत आहे. सुभाष बापू, राहुल दादा आणि योगेश दादांवर अजित पवारांनी अन्याय केलाय. हे तिन्ही लोक आतापर्यंत मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळालं असतं. आमचे आबासाहेब सोनावणे डीपीडीसीचा निधी मागायला गेले, तर अजितदादा म्हणाले तुमचा काय संबंध? आम्ही १० टक्के निधी देणार. अजितदादा असेल तर आम्हाला विधानसभेची सत्ताच नको. सोलापूरचीही तीच परिस्थिती आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीए. पुणे जिल्ह्याच्या लोकांचं हाल झालेत. ज्या राष्ट्रवादीला आम्ही १०-१० वर्षे विरोध करतोय. ते आता आमच्या भोकांडी बसलेत. अक्षरश: भाजपचे कार्यकर्ते भीतीच्या सावटाखाली आहेत. बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांपासून सर्वांचंच म्हणणं आहे. अजितदादा महायुतीत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ताच नको. कशासाठी पाहिजे? अजितदादा बॉस होणार आणि आदेश देणार?,' असं चौधरी म्हणाले.
सुदर्शन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केली आहे. सुदर्शन चौधरी यांनीच फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी मला संरक्षण द्यावं, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची दारुण पिछेहाट झाल्यापासून पक्षात अस्वस्थता आहे. भाजपच्या पराभवासाठी अजित पवार यांची साथ कारणीभूत ठरल्याची भावना भाजपमध्ये झाली आहे. केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणूकही अजित पवार यांच्या सोबतच लढवा असा आदेश दिल्यानं कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे. त्यामुळं यापुढील काळात महायुतीत नाराजीचे बरेच अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवरील नेते कार्यकर्त्यांची समजूत कशी घालतात यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.
संबंधित बातम्या