Salman Khan vs Lawrence Bishnoi : ‘प्राणी मारण्याचं सोडाच, सलमाननं कधी साधं झुरळ मारलं नाही. त्यामुळं तो कुणाचीही माफी मागणार नाही,’ अशा शब्दांत सलमानचे वडील, पटकथा लेखक सलीम खान यांनी ठणकावलं आहे.
काळवीटाच्या शिकारीच्या प्रकरणात नाव आलेल्या सलमान खान याला लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून सातत्यानं धमक्या येत असतात. काही दिवसांपूर्वी सलमानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबारही झाला होता. तसंच, त्याचे वडील सलीम खान हे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना एकानं त्यानं पत्र देऊन धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर त्याला पोलीस सुरक्षा व रिव्हॉल्वर बाळगण्याचा परवानाही दिला होता. आता माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची जिवाला धोका वाढला आहे.
सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई टोळीनंच केल्याचं तपासात उघड झालं आहे. सलमान व सिद्दीकी यांचे संबंध उत्तम होते. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यातच या हत्येनंतर मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला. सलमानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिष्णोईशी शत्रुत्व संपवायचं असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असं त्यात म्हटलं होतं.
या धमकीनंतर सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'सलमान खान माफी मागणार नाही. त्यानं कधीही प्राण्यांची शिकार केली नाही. सलमानला येणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी आहेत. सलमाननं कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. त्यानं कधी साधं झुरळही मारलं नाही. आमचा हिंसेवर विश्वास नाही, असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.
'लोक मला नेहमी म्हणतात की तुम्ही नेहमी खाली मान घालून चालता. तुम्ही खूप नम्र आहात. त्यावर मी त्यांना सांगतो की त्याचं कारण आहे. मी लाजाळू नाही. पायाखाली एखादी कीडा-मुंगी येईल, जखमी होईल, ही भीती मला वाटते. माझ्याकडून त्यांना काहीही होता कामा नये. म्हणून मी खाली बघून चालतो, असं सलीम खान म्हणाले.
'बीइंग ह्यूमन'नं अनेकांना मदत केली आहे. कोविडनंतर हे प्रमाण कमी झालं असलं तरी त्याआधी दररोज लांबच लांब रांगा लागत होत्या. काहींना शस्त्रक्रियेची गरज होती, काहींना इतर मदतीची गरज होती. दररोज चारशेहून अधिक लोक मदतीच्या आशेनं येत होते. त्या सर्वांना काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न सलमाननं केलाय, असं सलीम खान म्हणाले.
संबंधित बातम्या