Mumbai Monsoon: मुंबईत आज पहाटे पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवस उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम उपनगरातील वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली परिसरात देखील पावसाचा शिडकावा झाला. तर, गांधी मार्केट आणि माटुंगा परिसरात गुडघ्याभर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर, कांदिवली, मागठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर या शहरातील अनेक भागांमध्ये सकाळी ७ ते ८ या वेळेत ४ मिमी ते २६ मिमी पाऊस झाला. मध्य आणि दक्षिण मुंबईतही काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
किमान तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून कमाल ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सरासरी तापमान २९.६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा होती. आग्नेय वाऱ्यांचा अंदाज १६.७ किमी/ताशी वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. सूर्योदय सकाळी ०६:०० वाजता झाला आणि सूर्यास्त ०७:१४ वाजता अपेक्षित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात पावसासह किमान तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. गुरुवारचे किमान तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवार आणि शनिवारी ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. रविवार ते मंगळवारपर्यंत तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मान्सून जवळ आल्याने शहरात पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात ४-५ अंश सेल्सिअसने लक्षणीय घट होईल.
मुंबई येत्या ११ जून २०२४ रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. उष्मा आणि पाण्याच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. तलावाच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे, नागरी अधिकाऱ्यांनी ३० मे २०२४ पासून शहरात ५ टक्के कपात लागू केली. त्यानंतर आजपासून अतिरिक्त ५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला. परिणामी मुंबईकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे.
संबंधित बातम्या