Pune Water issue : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ससुन रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीमुळे या परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिमाण झाला आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले जाणार आहे. यामुळे पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुणे महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली आहे. यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (दि १६) हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि १७) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यातील पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबागपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार लिकेज होणे, फुटणे हे प्रकार वाढले आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे अशा पाइपलाइन दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहे. यामुळे काही भागातील पाणी पुरवठा हा काम सुरू असतांना बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.