Pune Water Supply News: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने आजूबाजुच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक भागांत आज (शुक्रवारी, १६ ऑगस्ट २०२४) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे येथील ससून रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली. या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (१७ ऑगस्ट २०२४) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून सर्वोपचार रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबागपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार परिसर.