Ajit Pawar on Baramti Watar issue : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज भरलेले उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. राज्यात बारामती येथे लक्ष्यवेधी निवडणूक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. संपूर्ण राज्याचे या मतदार संघाकडे लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज पासून त्यांनी गावभेट दौरा सुरू केला असून त्यांनी मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील एका गावात त्यांनी बारामती तालुक्याच्या पाणी प्रश्नावर म्हटवाच वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्यक्तव्याची चर्चा होत आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीला रंगत आली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात या निवडणुका होणार असून २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ तारखेला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बारामती येथे अजित पवार व युगेंद्र पवार यांनी प्रचार सुरू केला आहे. आज अजित पवार हे बारामती तालुक्यातील कटफळ येथे गावभेट दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी बारामतीच्या पाणी प्रश्नावर देखील त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.
अजित पवार बारामतीच्या प्राणी प्रश्नावर म्हणाले, मी नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलं आहे. तालुक्यात अनेक गावात पाणी प्रश्न हा गंभीर आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, मी नियमात नसतांना बारामतीकरांना पाणी दिलं. या साठी सर्व नियम डावलले. त्यासाठी अधिकाऱ्यांना भाग पाडलं. या सर्वांसाठी नेतृत्वात धमक असावी लागते. माझ्या लोकांचे नुकसान होत असून मला पाणी पाहिजे असं सांगून मी तालुक्यात पाणी आणलं आहे, असे पवार यांनी ग्रामस्थांशी बोलतांना म्हटलं आहे.
अजित पवार यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान, बारामती तालुक्यातील सावळ गावाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. मात्र, आता विधान सभेत मला मतदान करा. लोकसभेत साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा, असे देखील अजित पवार म्हणाले.