मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Madh Demolition : रामसेतू आणि आदिपुरुषची शूटिंग झालेला मुंबईतील फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त

BMC Madh Demolition : रामसेतू आणि आदिपुरुषची शूटिंग झालेला मुंबईतील फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 07, 2023 02:28 PM IST

BMC demolition Mumbai Madh Island Studio : मुंबईतील मढच्या किनाऱ्यावरील बेकायदा फिल्म स्टुडिओ महापालिकेनं आज जमीनदोस्त केला.

illegal construction demolition
illegal construction demolition

BMC demolition Mumbai Madh Island Studio : आदिपुरुष व राम सेतू या सिनेमांचं शूटिंग झालेला मुंबईतील मढ-मार्वे येथील फिल्म स्टुडिओ मुंबई महापालिकेनं आज जमीनदोस्त केला. हा स्टुडिओ बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याची तक्रार होती. राष्ट्रीय हरित लवादानं मुंबई महापालिकेला स्टुडिओवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मढ परिसरात जवळपास अर्धा डझन बेकायदा स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. स्टुडिओ उभारताना सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचा आरोप होता. याच स्टुडिओंमुळं माजी मंत्री अस्लम शेख हे ईडीच्या रडारवर आले होते. हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादापर्यंत गेलं होतं. लवादानं या स्टुडिओंवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. त्यानुसार आज पहिली कारवाई करण्यात आली. असे अन्य काही स्टुडिओ देखील पाडण्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेची कारवाई सुरू असताना किरीट सोमय्या स्वत: तिथं पोहोचले आणि त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर तोफ डागली. 'फेब्रुवारी २०२१ साली ठाकरे सरकारनं या स्टुडिओंना बेकायदा परवानगी दिली होती. हे स्टुडिओ तात्पुरत्या स्वरूपात असतील असं सांगण्यात आलं होतं. जवळपास ५ हजार चौरस फुटांवर डझनभर स्टुडिओ उभारण्यात आले होते. ह्या बांधकामावर आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख स्वत: लक्ष ठेवून होते. महापालिकेनं तब्बल चारवेळा या स्टुडिओच्या मुदतीत वाढ केली होती, असं सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावरही निशाणा साधला आहे. चहल यांना या बेकायदा कामाची माहिती होती. मात्र, त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो होतो. कोर्टानं यावरून महापालिकेला खडे बोल सुनावत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश दिले होते, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग