Maharashtra Weather Update : राज्यात सूर्य आग ओकत आहे. पारा हा ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचला आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा देखील इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यात पारा हा ४० पार गेला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मध्य माहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, आणि कोकण विभागात पुढील चार दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी पाच एप्रिल पासून हा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमध्ये एक द्रोणीय रेषा दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भ पर्यंत असून जी कर्नाटक व मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे राज्यात सर्वत्र पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. याच बरोबर कमाल तापमान हळूहळू दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात व आठ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशात हिमालयाच्या पायथ्याचा काही भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्ली तसेच पूर्ण दक्षिण भारतात तापमान वाढले आहे. येथील कमाल तापमान हे सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. हे तापमान पुढील चार-पाच दिवस वाढत राहणार आहे. राज्यात प्रामुख्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात कमाल तापमान वाढ झाली असून हे तापमान ३८ ते ४० अंशाच्या दरम्यान राहील.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात वाढ होणार आहे. साधारण, दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने ही तापमान वाढ होणार आहे. यामुळे रात्रीही उकाडा जाणवणार आहे, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा हा ४० अंशांवर पोहचला होता.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पुढील पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ राहणार आहे. तर सात आणि आठ तारखेला आकाशात ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे आणि दमट वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. घामाच्या धारा आणि ऊन यामुळे अंगाची लाही लाही होत आहे मुंबईचे तापमान मंगळवारी साधारण ३२ डिग्रीवर पोहचले होते. तर सांताक्रूझ येथील तापमान हे ३२.९ डिग्री सेल्सिअस एवढे होते.