वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला व कंपनीत आग लागली. या स्फोटात १७ कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
एवोनिथ स्टील कंपनीत कुलिंग प्रोसेस सुरू असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटात १७ कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमी कामगारांना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असलेल्या कामगारांना नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दोन गंभीर जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
स्फोटानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान कंपनीत कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, कंपनीत काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पाहायला मिळालं. स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केलं होते. आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दूरवरून दिसत होते. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.