Wardha Sawangi Suicide News: वर्धा जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. विद्यार्थीनीच्या आत्महत्येच्या कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, आत्महत्यापूर्वी विद्यार्थिनी स्नॅप चॅटवर 'आय क्विट' अशी पोस्ट केली होती. महाविद्यालयात परिक्षेपासून वंचीत ठेवले जात असल्याने मृत विद्यार्थिनीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिचे आई-वडील करत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा राजनी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. नागपूर येथील रहिवासी असलेली पूजा वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार होत्या. यासाठी हॉलतिकीट मिळवण्यासाठी ती प्रशासकीय कार्यालयात गेली. पण महाविद्यालयात ७५ टक्के हजेरी नसल्यानं तिला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले. यानंतर गुरुवारी पूजाने सकाळी नेहमीप्रमाणे पहिले लेक्चर अटेंड केले. त्यानंतर ती लायब्ररीमध्ये गेली आणि काही वेळानंतर तिने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी स्नॅप चॅटवर 'आय क्विट' अशी पोस्ट केली. आत्महत्यापूर्वी पूजाने आपल्या पालकांना फोन करून तिला मानसिक त्रास होत असल्याची माहिती दिली, असेही समजत आहे. पूजा आत्महत्येने तिच्या मित्र मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे. तर, पूजाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
साताऱ्यात मैत्रीणीने केलेल्या मस्करीमुळे २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या केली. मैत्रिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. गायत्री भोईटे असे अट करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता मनीष पाटील नावाच्या इन्स्टाग्राम कॉन्टॅक्टशी गेल्या काही दिवसांपासून चॅट करत असल्याचे आढळले. वाठारचे पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी सांगितले की, भोईटे हिने मनीष पाटील नावाचे बनावट प्रोफाईल तयार करून मृतव्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिच्या प्रेमात पडल्याची कबूली दिली. त्यानंतर मृत तरुणीने मनीषला भेटण्याचा हट्ट धरला. यानंतर भोईटेने शिवम नावाचे प्रोफाइल तयार केले आणि १० जून रोजी मनीषने आत्महत्या केल्याचे मृत तरुणीला सांगितले. मात्र, यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाठार पोलिसांनी भोईटे याला अटक केली आहे. भोईटे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.
संबंधित बातम्या