Wardha food poisoning News : वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्याना मेसमधील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मेसमध्ये शिळे अन्न दिले जात असल्याचा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मेजमधील जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
वर्धा जिल्ह्यात काही इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. स्थानिक मुलांसह परराज्यातील मुले देखील या ठिकाणी शिक्षण घेत असतात. बाहेरगावावरून आलेल्या मुलांना जेवणासाठी मेसवर अवलंबून राहावे लागते. या मेस मधील जेवण कसेही असले तरी त्यांना खावे लागते. याच जेवणामुळे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्धा येथील पिपरी मेघे परिसरात असलेल्या बजाज इंजिनिअरिंग महाविद्यालयात हा प्रकार घडला. कॉलेजच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेत २९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे.
या मुलांनी मेसमधील मंच्युरीयन व पनीर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. यात २६ मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पिपरी येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी महाविद्यालयात वसतीगृहात राहतात. वसतीगृहाच्या मेसमध्ये त्यांना रोज जेवण दिलं जात. मात्र, या जेवणाचा दर्जा खराब असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. मुलांनी या बाबत महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती. मात्र, यावर काहीच कारवाई झाली नाही. सोमवारी मुलांनी मेसमधील जेवणात मंच्युरीयन व पनीरची भाजी खाल्ली. यामुळे त्यांना मळमळ, उलट्या व पोट मुरडून येण्यासारख्या तक्रारी वाढल्या. या सर्व मुलांना दवाखान्यात भरती करण्यात आले. यानंतर देखील त्यांच्या तक्रारी वाढल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारी नुसार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपचारांसह महाविद्यालयातील पाणी, जेवणाची तपासणी केली. दरम्यान, या प्रकरणी नमुने दोषी आढळल्यास संबंधित मेस चलकावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील विद्यायल प्रशासनाने दिली आहे .
संबंधित बातम्या