वर्ध्यात विचित्र अपघात.. दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू-wardha accident news three people died in truck car two wheeler accident ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वर्ध्यात विचित्र अपघात.. दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

वर्ध्यात विचित्र अपघात.. दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

Mar 23, 2024 10:46 PM IST

Wardha Accident : वर्ध्यात विचित्र अपघात झाला आहे. रस्त्यात बंद पडलेल्या टिप्परला भरधाव दुचाकी धडकली. दुचाकीस्वाराच्या मदतीला थांबलेल्या कारला दुसऱ्या टिप्परने चिरडलं. यात तीन जणांचा मृत्यू झाला.

दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू
दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

वर्ध्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. हा अपघात वर्धा जिल्ह्यातील वडनेर ते शिरसगाव रस्त्यावरील येरणगाव येथे घडली. रस्त्यात बंद पडलेल्या टिप्परला पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने धडक दिली. यानंतर मोटारसायकल स्वाराच्या मदतीसाठी कार थांबली होती. कारमधील व्यक्ती दुचाकी चालकाच्या मदतीसाठी खाली उतरताच समोरून गिट्टीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने कारला उडवले. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. 

टिप्परने कारला दिलेली धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. विजय देवतळे (वय ४५), अक्षय कोलकडे (वय २५, दोघे रा. येरणगाव)  आणि  राहुल नैताम (वय २७ रा. अलमडोह) अशी मृतांची नावे आहे. रतन पचारे आणि अर्जुन मोरे (३५) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वडनेर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

वडनेर ते शिरसगाव रस्त्यावर येरणगाव  येथे एक टिप्पर शनिवारी सकाळपासून नादुरुस्त स्थितीत रस्त्याकडेला उभा होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेली दुचाकी टिप्परवर आदळली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. एकजण रस्त्यात जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून शिरसगावकडून येणारी एक कार त्याच्या मदतीसाठी थांबली. 

कार थांबवून कारचालक जखमी मोटारसायकलस्वाराच्या मदतीला धावला. जखमी व्यक्तीला घेऊन कारमध्ये बसवत असतानाच वडनेरकडून भरधाव येणाऱ्या वाळूने भरलेल्या टिप्परचालकाने कारला चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात कारचालक व मोटारचालकाचा समावेश आहे. 

Whats_app_banner