Walmik Karad Wife Manjili Karad : वाल्मिक कराड याच्याविरोधात आज मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय पुरता खोलात अडकला असला असून त्याचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. सर्मथकांसह कराड कुटुंबीयांनी आज परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. हे आंदोलन १२ तासानंतर पाठीमागे घेतले आहे. दरम्यान एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर खून प्रकरणात त्याचा ताबा सीआयडीने मागितला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परळीत कराड कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा धारण करून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. कराड याची पत्नी,आई आणि सून यांनी माध्यमांना आक्रमक प्रतिक्रिया देऊन आम्हाला केवळ राजकारणापोटी अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला.
वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजिली कराडम्हणाल्या की, खंडणी आणि हत्या प्रकरणात माझ्या पतीचा कुठलाही सहभाग नाही. केवळ राजकारणातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. समोरील लोक मराठा समाजाचा आधार घेऊन आंदोलने करत आहेत. पण मी पण मराठ्याचीच आहे. मी पण ९६ कुळी आहे. मी माझ्या जातबांधवांना सांगू इच्छिते, की वंजारीसारख्या छोट्या जातीला कशाला टार्गेट करता? त्यांना लक्ष्य करू नका. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते.
मंजिली कराड म्हणाल्या की,बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यांनी सुरेश धस यांच्यावरही आरोप केले. जिल्हातील दोन मंत्री हे वंजारी या अल्पसंख्यांक समाजाचे झाल्याने मराठा नेत्यांना पटलं नाही. त्यावेळी तुमची माती करतो असं सुरेश धस म्हणाले होते. वंजारी समाजाचे दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. हे सर्व जातीच्या द्वेषातून घडलं आहे.
आंदोलन करताय, टाक्यांवर चढताय, मोर्चे काढताय… असे करून न्याय मिळतो का. ही कुठली पद्धत आहे? अशी संतापजनक प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या सूनेने दिली. दबाव निर्माण करून गुन्हे दाखल होत असतील तर हे योग्य नाही. गेले एक महिना आम्ही सगळे शांत होतो, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आहे.
वाल्मीक अण्णांच्या आईची तब्येत खराब आहे. दवाखान्यात जायला नकार देत आहेत. त्यांना दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना काही झाल्यास याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशाराही कराडच्या सूनेने दिला.
संबंधित बातम्या