मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vulture in Raigad: वर्षभरात १०० गिधाडं गायब?

Vulture in Raigad: वर्षभरात १०० गिधाडं गायब?

HT Marathi Desk HT Marathi
Sep 23, 2022 05:54 PM IST

कोकणात घोंघावणारी वादळे, वातावरणातील बदल आणि कोविड लॉकडाउनमुळे गिधाडांच्या संख्येत घट झाली असल्याचं मत पक्षी संवर्धनकांनी व्यक्त केलं आहे.

रायगड जिल्ह्यात गिधाडांच्या संख्येत घट
रायगड जिल्ह्यात गिधाडांच्या संख्येत घट

निसर्गाचं समतोल राखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा पक्षी म्हणून गिधाड मानला जातो. कोकणात रायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या मोठी आहे. खासकरून श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यात गिधाडे दिसून येत असून याच्या संवर्धनाचे कामही चालते. परंतु ताज्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या तब्बल १०० ने कमी झाली असल्याची माहिती आहे. ‘सोसायची फॉर इको-एन्डेन्जर्ड स्पेसिज कॉन्जर्वेशन अॅण्ड प्रोटेक्शन’ या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कोकणात गेल्या दोन वर्षात आलेली विविध वादळं, वातावरणातील बदल आणि कोविडचं लॉकडाउन यामुळे या पक्ष्यांच्या खाद्य पुरवठ्यावर परिणाम झाल्या असल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.

संपूर्ण भारतात गिधाडांच्या एकूण नऊ प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा रायगड जिल्ह्यामध्ये कायमस्वरुपी अधिवास आढळून येतो. शिवाय येथे स्थलांतर करुन येणारी गिधाडं ही भरपूर आहेत. यात प्रामुख्याने हिमालयीन ग्रिफाॅन, युरेशियन ग्रिफाॅन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. कोकणात आलेल्या तौक्ते आणि निसर्ग या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात खूप नुकसान झालं होतं. वादळामुळं म्हसळा आणि तळा या तालुक्यात हजारो झाडे उन्मळून पडली होती. झाडे पडल्याने गिधाडांचा अधिवासही धोक्यात आला आहे. भीतीने अनेक गिधाडे स्थलांतरित झाल्याचे गिधाड गणनेत दिसून आले आहे. याचा एकूणच परिणाम जिल्ह्यात गिधाड अधिवासावर झाला आहे. रायगड जिल्ह्यात मार्च २०२१ मध्ये एकूण ३४७ गिधाडे आढळून आली होती. परंतु वर्षभरानंतर मार्च २०२२ मध्ये केलेल्या गणनेत ही संख्या घटून २४९ एवढी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संख्येत ३४ टक्क्याने तर लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येत १८ टक्क्याने घट झाली असल्याचे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

जिल्ह्यात असलेल्या गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत गिधाडांना अन्नपुरवठा केला जायचा. मात्र टाळेबंदीच्या निर्बंधामुळे हा अन्नपुरवठा बंद पडला होता. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण होऊन त्यांनी स्थलांतरण केला असल्याचा अंदाज अभ्यासकांना वर्तवला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग