वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता गिधाड पक्षांचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनात अतिशय महत्वाचा मानला जाणारा गिधाड पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गिधाडांचे ताडोबातील अधिवासामुळे निसर्गाची श्रृंखला पुर्नस्थापित होण्यास मदत होणार आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी द्वारे संचालित पिंजोर (हरयाणा) येथील ‘गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रा’तून पांढऱ्या पाठीचे १० गिधाड पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहे. साधारणत: ३ महिन्यानंतर या गिधाडांना निसर्गात मुक्त करण्यात येणार आहेत. सध्या १० गिधाड पक्षी असून यानंतर त्याची संख्या २० आणि पुढे ४० करण्यात येणार आहे.
गिधाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणाऱ्या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असतो. भारतात गिधाडाच्या ९ प्रजाती आढळतात. १९९० साली गिधाडांची संख्या चार कोटी होती. आता ती संख्या कमी होऊन केवळ ५० हजारांवर आली आहे. गिधाडे नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या प्राण्यातून देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन गिधाडांच्या शरीरात जाते आणि परिणामी गिधाडे मरत असल्याचे आढळून आले आहे.
वनांसोबत आयुष्याचे एक नाते असते. वनांपासून वनांसाठी मनापासून काम करणाऱ्यांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री मुणगंटीवार यांनी केली. ताडोबा उत्सवामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबातील बोटेझरी येथे ‘जटायु संवर्धन राज्यस्तरीय प्रकल्पा’चे उदघाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, संचालक किशोर रिठे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता उपस्थित होते.
संबंधित बातम्या