मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress President Election : शशी थरूर की मल्लिकार्जुन खर्गे?; मतदान तर झालं आता निकालाची प्रतीक्षा

Congress President Election : शशी थरूर की मल्लिकार्जुन खर्गे?; मतदान तर झालं आता निकालाची प्रतीक्षा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 17, 2022 05:43 PM IST

Who Will Win Congress President Election : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण खर्गे की थरूर विराजमान होणार याचा निकाल १९ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान करताना सोनिया गांधी
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान करताना सोनिया गांधी

नवी दिल्ली– काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण खर्गे की थरूर विराजमान होणार याचा निकाल १९ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनीअध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. अध्यक्षपदासाठी देशात जवळपास ९८०० मतदार आहेत. हे मतदार मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर या दोन्हींपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतील. मतदानासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ स्थापन करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. तर १९ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, मतदार जवळच्या मतदान केंद्रांवर पाठिंबा देणाऱ्या उमेदवारासमोर 'टिक' करून मतदान केले. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पक्षाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सोनिया गांधी,प्रियांका गांधी, जयराम रमेश, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रियापार पडली. येथे तीनतीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले होते.

काँग्रेसच्या इतिहासात केवळ सहाव्यांदा निवडणुका -

काँग्रेसच्या १३७ वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकाही सदस्याने भाग घेतला नाही. म्हणजेच यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील बाहेरचा सदस्य असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

WhatsApp channel