Virar-Alibaug Corridor Project : पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या कामास सुरूवात होणार आहे. १२८ किमी लांबीच्या या मार्गासाठी पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या महिन्यात भूसंपादनाचे काम ८० टक्के पूर्ण करण्याचे उदिष्ट एमएमआरने ठरवले आहे. मार्च-एप्रिल २०२४ पर्यंत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
अलिबाग-विरार कॅरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर विरारहून अलिबागचा प्रवास दीड ते दोन तासांत पूर्ण होणे शक्य होणार आहे. सध्याच्या काळात विरारहून अलिबागला पोहोचण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. मार्ग पूर्णत्वास गेल्यास हे अंतर दीड तासात पार पडणार आहे. १२५ किमी लांबीच्या या मार्गासाठी सगळ्यात पहिलेड डीपीआर २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. सुरुवातीला कॉरिडॉरची जबाबदारी एमएमआरडीएकडे होती मात्र, भूसंपादनासाठी होत असलेला विलंब पाहून सरकारने कॉरिडॉर निर्माणाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपवली आहे.
विरार-अलिबाग मार्गाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा ९८ किमी आणि दुसरा टप्पा २९ किमीचा असेल. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पालघरमध्ये जवळपास ९३ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. तर, ठाणे आणि रायगडमधील जमीन हस्तांतरणाचे काम पुढील वर्षी एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
विरार-अलिबाग कॅरिडॉरमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर व वेगवान होणार आहे. एमएमआरए मध्ये तयार होत असलेल्या सर्व प्रकल्पांना एकमेकांसोबत जोडण्यात येणार आहे. विरार-अलिबाग प्रकल्पासाठी सरकार एमएमआरमध्ये रिंग रोड तयार करणार आहे. याअतर्गंत विरार-अलिबाग कॉरिडॉर, शिवडी-न्हावासेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रॉजेक्ट, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंक सह अन्य प्रकल्पांसोबत जोडले जाणार आहे. यातील शिवडी-न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंकवरुन येत्या दोन ते तीन महिन्यात प्रवास करता येणार आहे.