Telangana Woman Survives Train Passing Over Her: रेल्वे रूळ ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. चुकीच्या मार्गाने रेल्वे रूळ ओलांडणे हा फौजदारी गुन्हा आहे. यात तुमचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही लोक स्वत: जीवाची पर्वा न करता चुकीच्या मार्गाने रेल्वे रुळ ओलांडतात. अशा घटनांमध्ये आतापर्यंत कित्येकांना मृत्यू गाठले आहे. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना महिलेच्या अंगावर अख्खी ट्रेन जाते. परंतु, तिला साधे खरचटतही नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील नावंदगी रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. आदिवासी महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. इतक्यात एक मालगाडी आली. महिलेला पुढे जाता न आल्याने ती रेल्वे रुळावर झोपली. आश्चर्याची बाब म्हणजे, संपूर्ण मालगाडी तिच्या अंगावरून जाते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती महिलेला डोके वर करू नका, असे सांगत आहे. काही वेळाने संपूर्ण मालगाडी महिलेच्या अंगावरून जाते. मालगाडी गेल्यानंतर महिला उभी राहते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अशीच एक घटना मध्य प्रदेशातील शाजापूरमधून समोर आली होती, जिथे एक वृद्ध महिला रेल्वेखाली गेली. संपूर्ण रेल्वे तिच्या अंगावरून जाते, पण महिलेला बाहेर काढले जाते, तेव्हा तिच्या शरिरावर साधे खरचटतही नाही. घरगुती वादातून महिलेने रेल्वेसमोर उडी घेतली होती. सुदैवाने, तिला काही झाले नाही.
बिहारमधील दानापूरमध्येही अशीच एक घटना घडली होती. बारह रेल्वे स्थानकावर एक महिला आपल्या दोन मुलांसह रेल्वे रुळांवर पडली. इतक्यात रेल्वे सुरू झाली. संपूर्ण रेल्वे महिला आणि तिच्या दोन मुलांच्या अंगावरून धावली. पण तिघेही सुखरूप बाहेर पडले. जोपर्यंत ट्रेन महिलेच्या अंगावरून जात नाही, तोपर्यंत महिलेने आपल्या मुलांना छातीशी धरले.