Viral News: मुंबई शहराच्या उपनगर परिसरात पोलीस अधिकारी म्हणून भासवणाऱ्या एका व्यक्तीने ई-सिगारेटच्या ओढणाऱ्या महिलेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. साध्या पोशाखात असलेल्या या व्यक्तीने महिलेला अटक केली आणि तिला ऑटोरिक्षातून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना तिच्याकडून ५० हजारांची मागणी केली. मात्र, या महिलेने हुशारीने वाटेतच त्याचा व्हिडिओ बनवला आणि सत्य समोर आले.
मिळालेल्या महितीनुसार, ही घटना मुंबईतील पवई परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आला? हे समजू शकलेले नाही. संबंधित महिला ई-सिगारेट ओढत असताना असताना तोतया पोलिसाने तिला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर तोतया पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. परंतु, काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. यामुळे तिने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओमध्ये महिला बोलत आहे की, ‘मी सध्या एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) रोडवर आहे. हा माणूस माझ्यामागे आला आणि ऑटोरिक्षात बसला. आता तो मला जबरदस्तीने पवई पोलीस चौकीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. महिला पोलीस अधिकारीसोबत नसताना मला कुठेही नेऊ शकत नाही’, असेही महिला बोलत आहे. महिला व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे तोतया पोलिसाच्या लक्षात येताच तो लगेच रिक्षातून बाहेर पडतो आणि घटनास्थळावरून पळून जातो.
@Mard_Maratha_0 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ६ हजार लोकांनी पाहिला आहे. तर, अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट येत आहेत.